मुंबई (प्रतिनिधी) : रायगडमधील मुरुड तालुक्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या चौकशीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही.

याचिकेनुसार, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी मालक अन्वय नाईक यांच्याकडून वादग्रस्त मालमत्ता २ कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्यापैकी केवळ दहा लाख रुपये दिले गेले. सोमय्या यांच्या मते, हे प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९६१ (२६९) एसटीचे उल्लंघन आहे.’

सोमय्या यांनी याचिकेत उद्धव ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेवरील बांधकाम लपवून त्यांचे अवमूल्यन केल्याचे म्हटले आहे. हे लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. सोमय्या यांनी तपास अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच मालमत्तेची स्थिती, त्यातील बांधकाम आणि पेमेंट पद्धतीची चौकशी करण्यास सांगितले आहे.

याचिकेत उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी रश्मी, शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना पक्षकार करण्यात आले आहे. सोमय्या यांच्या याचिकेनुसार ही मालमत्ता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी मिळून रायगडमधील मुरुड तालुक्यातून खरेदी केली होती. अलिबागमधील मालमत्तेसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित बेकायदेशीर कृत्यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.