मुंबई: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे वातावरण असते तर एवढी प्रगती साधलीच नसती. नरेंद्र मोदी व भाजपा हेच सतत निराशेच्या गर्तेत असल्याने त्यांना सर्वत्र निराशाच दिसते. १० वर्ष सत्ता असताना विकास कामे न केल्याने काँग्रेसला शिव्या देणे, प्रभूरामाच्या व धर्माच्या नावावर मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रचार सभेत केलेल्या आरोपांचा नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात विकास कामे झाली नाहीत हा पंतप्रधान मोदींचा आरोप धादांत खोटा व केवळ राजकीय आहे. खरे पाहता काँग्रेस सरकारनेच ६० वर्ष विविध क्षेत्रात दैदिप्यमान विकास काम केली. काँग्रेस पक्षाच्या सरकारांनीच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था उभारल्या. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात ज्या सरकारी संस्था विकून देश चालवला त्या काँग्रेस सरकारने स्थापन केल्या होत्या याचा मोदींना विसर पडलेला दिसतो. देशात सर्व काही २०१४ नंतरच झाले हे मोदींचे विधान गोड गैरसमज असलेल्या अंधभक्तासारखेच आहे.

मोदी यांनी या सभेत राहुल गांधी, काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीवर बिनबुडाचे आरोप केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शिवाजी महारांजाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. शिवाजी महाराजांचे नाव फक्त मते मागण्यासाठी केला जात आहे. अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बनवण्याच्या जलपुजनाचा कार्यक्रम डिसेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला पण आजपर्यंत या शिवस्मारकाची एक विटही रचलेली नाही. निवडणुका आल्या की भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते.

नरेंद्र मोदी यांनी १० वर्षाच्या काळात जनतेच्या खिश्यावर दरोडा टाकून अदानीचे घर भरण्याचे काम केले आहे. मोदींनी फसवल्याची भावना जनतेत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी गॅरंटीवर कितीही भर दिला तरी जनता त्यावर विश्वास ठेवत नाही. मोदींची गॅरंटी खोटी असल्याचा अनुभव १० वर्षात देशातील जनतेला आलेला आहे, आता जनता खोट्या मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.