सांगली (प्रतिनिधी) : राज्य, केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना मदत करावी. अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते रविवारी सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र सरकारने पंचनाम्यांसाठी पथके पाठवावित, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. याची दखल घ्यावी. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलमडलेल्या शेतक-यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करावी. केंद्र सरकारनेही हात झटकू नयेत. सरकारने वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल. महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. बिहारमधील आपत्ती काळात केंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठी मदत केली. महाराष्ट्रासाठी तितक्याच गतीने मदतीचा हात का पुढे आला नाही? केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांचे नुकसान लक्षात घेऊन मदत करणे गरजेचे आहे