बीड (प्रतिनिधी) : कोट्यावधी ठेवींचा प्रश्न तत्काळ निकालात काढा. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराच्या दारात येऊन सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा मैत्रेय फंडमध्ये  पैसे गुंतवलेल्या ठेवीदार महिलांना दिला आहे.

वादग्रस्त ठरलेल्या मैत्रेय फंडमध्ये राज्यातील अनेक लोकांनी पैसा गुंतवला आहे.  बीड जिल्ह्यातील २५ ते ३० हजार गुंतवणूकदारांच्या सुमारे ४०  कोटी रुपये ठेवी अडकल्या आहेत. संचालकांनी   मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचे फोटो, अभिप्राय, पुरस्कार दाखवून ठेवी गोळा करण्यात आल्या आहेत. परंतु आता  संचालकांकडून ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. लोक दारात येऊन आत्महत्या करण्याच्या धमक्या देत आहेत. तर शहरातील काही जणांनी पैसे बुडाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या ठेवीचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा त्यांच्या दारात जाऊन सामूहिक आत्मदहन करू,  असा इशारा ठेवीदार महिलांनी दिला आहे.