कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्माते महेश कोठारे यांच्या ‘दख्खनचा राजा श्री. जोतिबा’ या मालिकेमध्ये देवी ‘महालक्ष्मी’ या नावाऐवजी ‘श्री आई अंबाबाई’ हा उच्चार करावा, नाहीतर मालिकेचे शुटींग बंद पाडण्यात येईल. असा इशारा कोल्हापुरातील एका शिष्ट मंडळाने आज निवेदनाद्वारे दिला आहे.

मराठी चित्रपट आणि नाट्य विभागामधील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांची ‘दख्खनचा राजा श्री जोतिबा’ ही मालिका प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. त्यामध्ये लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याच्यावतीने एक अक्षम्य अशी चूक घडली आहे. कोल्हापूरची करवीर निवासनी श्री आई अंबाबाई याऐवजी श्री महालक्ष्मी असा उल्लेख करण्यात आला आहे. गेली ५ वर्ष झाले कोल्हापूरकर ‘श्री आई अंबाबाई’ च्या निगडित अनेक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी धडपडत आहेत. मग तो स्त्रियांचा गाभारा प्रवेश असो, जुने फलक हटवून नविन फलक लावणे असो किंवा देवीच्या नामाचा नाजूक विषय असो.

या प्रत्येक कारणासाठी करवीरवासीयांनी जन आंदोलन केली आहेत आणि ती यशस्वी झाली आहेत. तरी महेश कोठारे यांना समस्त करवीरवासीयांकडून विनंती आहे की ही झालेली चूक दुरूस्त करावी नाहीतर मालिकेचे शुटींग बंद पाडण्यात येईल. असा इशारा कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते बाबा पार्टे यांच्या शिष्ट मंडळाने आज निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी संदीप घाटगे,विवेक कोरडे,किरण पोवार,प्रकाश घाटगे,स्वप्नील पार्टे, रवी इनामदार,वैशाली महाडिक, संपदा मुळेकर, रुपाली पाटील, नीता पडळकर, विद्या घोरपडे, जयकुमार शिंदे,शुभांगी साखरे, मंगल खुडे, निकिता कापसे, सरिता घाटगे आदि उपस्थित होते.