कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बॅटिंग घेणाऱ्या एकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. उमेश नंदकुमार शिंदे (वय ३९, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तावडे हॉटेल परिसरातील एका हॉटेलमध्ये सांगली येथील उमेश शिंदे हा दुबईत सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचचे बॅटिंग घेण्यासाठी तनवाणी हॉटेलमध्ये राहायला असून तो क्रिकेट बॅटिंग घेत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता एका रूममध्ये कलकत्ता नाईट रायडर्स व सनरायझर हैदराबाद या संघांमध्ये सुरू असलेल्या बॅटिंग घेताना उमेश शिंदे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लॅपटॉप, २ मोबाइल हँडसेट, २ कॅल्क्युलेटर, एटीएम कार्ड असा ३६ हजार सहाशे ११ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उमेश शिंदे हा हे क्रिकेट बेटिंग सांगलीतील वखारभागातील सनी उर्फ मिलिंद शेटे याला पाठवत असल्याचे चौकशीमध्ये उघड झाले. त्यामुळे शिंदे व शेटे या दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. तानाजी सावंत, सपोनि सत्यराज घुले, संतोष पवार, हवालदार संजय पडवळ, कृष्णा पिगळे, अनमोल पवार व संतोष पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता