वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज (शनिवार) दख्खनचा राजा श्री जोतिबाची नागवेली पानातील अलंकारिक महापूजा मानकरी आणि पुजाऱ्यांच्या हस्ते बांधण्यात आली. त्याचप्रमाणे माता श्री चोपडाई देवीचीही बैठी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. तसेच धुपारती सोहळ्याने घटस्थापनेचा धार्मिक विधी करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश बंदीच आहे. त्यामुळे मोजकेच मानकरी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव काळातील विधी पार पडणार आहेत.
श्री जोतिबाच्या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ पहाटे तीन वाजता महाघंटेच्या नादाने झाला. पहाटे चार वाजता श्री जोतिबा मूर्तीचे पाद्यपूजा करण्यात आली. पाच वाजता महाभिषेक सोहळा संपन्न झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला नागवेली पानातील आकर्षक अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा मंदिरात पारंपरिक विधीने घट बसविण्यात आले. साडेनऊ वाजता श्रीचें मुख्य पुजारी, समस्त दहा गावकरी आणि उंट, घोडे, वाजंत्री, महालदार, चोपदार, देवस्थान इंचार्ज महादेव दिंडे, सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे आणि देवसेवकांच्या लवाजमा श्री यमाई मंदिराकडे रवाना झाला. श्री यमाई मंदिर, श्री तुकाई मंदिरात घट बसविण्याचा विधी झाला. सुवासिनींनी पाणी घालून धुपारतीचे दर्शन घेतले.