चंदगड (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अनेकांनी पवार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार राजेश पाटील यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. राष्ट्रवादीची डिजिटल रॅली चंदगडपर्यंत पोचली हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आपल्या राष्ट्रवादीचे टीमचे यश आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

आ. पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. पवार यांनी आ. पाटील यांना वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचा कार्यक्रम तालुक्यातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचला का, कार्यक्रम कसा वाटला असे विचारले. आ. पाटील यांनी सांगितले की, आम्ही आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. अनेक नेत्यांनी आपण राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यामुळे कार्यकर्त्यांचे आपल्याबद्दलचे प्रेम दृढ झाले. यानंतर पवार यांनी व्हर्च्युअल रॅली चंदगडसारख्या दुर्गम तालुक्यात पोहचविण्याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीच्या सर्व टीमला दिले.

आ. पाटील यांनी या वेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवर व अडीअडचणींबाबत पवार यांचेशी विस्तृत चर्चा केली. त्याबाबत पवार यांनी याबाबत आपण स्वत: त्यामध्ये लक्ष घालून हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.