पंढरपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे बोलले जात आहे. त्रास होत असल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

भारत भालके यांचा थेट जनतेशी संपर्क होता. स्वभावाने बेधडक असलेल्या भालके यांच्याशी कार्यकर्त्यांचाही थेट संपर्क असायचा. जनतेशी दांडगा संपर्क असल्यानेच सलग तीन वेळा ते विधानसभेत पोहोचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल (शुक्रवार) दुपारी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उपचार सुरू असतानाच भारत भालके यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे आज (शनिवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.