गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असून कांही अंशी त्यात यश येऊ लागले आहे. पण गडहिंग्लज तालुक्यातील कांही शहरी भागाशी सतत संपर्क येणाऱ्या खेड्यापाड्यात अद्यापही सातत्याने बाधीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता ही साखळी तोडण्यासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाचे रूपांतर लोकचळवळीत करा अशी सूचना गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केली. आज (बुधवार) सकाळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. सभापती रुपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी मगर म्हणाले की, तालुक्यात १५७ टीमच्या माध्यमातून ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत दैनंदिन सर्वे सुरू आहे. दोन कोव्हीड सेंटर्स आणि तीन खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून बाधीत रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा लवकरच कार्यन्वित होत असून सर्व प्रकारचा आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आता फक्त या लढ्यात लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी. कोणतीही सौम्य लक्षणे जाणवताच लोकांनी सर्वे करणाऱ्या टीमला खरी माहिती देणे आणि स्वतःहून उपचारासाठी पुढे आल्यास या महामारीवर सहजपणे मात करता येणार आहे. त्यामुळे आता हे अभियान ‘लोकचळवळ’ बनविणे गरजेचे असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.
खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर लक्ष देण्याची सूचना विठ्ठल पाटील यांनी केली. शिवाय व्यवस्थित संपर्क होत नसल्याने सभा सुरक्षित अंतर ठेवून सभागृहातच घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यावर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सभा ऑनलाईनच घेता येणार असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, महावितरण आदी विभागांचा आढावा कांही खातेप्रमुखानी ऑनलाईन तर कांहीनी सभागृहात उपस्थित राहून घेतला.
यावेळी उपसभापती श्रिया कोणकेरी, सदस्या इंदू नाईक या सभागृहात तर विठ्ठल पाटील, विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.