कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीजबिलांच्या थकबाकीमध्ये गेल्या मार्च ते सप्टेंबरपर्यंत तब्बल ३३२ कोटी ९४ लाख रुपयांनी वाढ झाली. असून सद्यस्थितीत ७ लाख ३४ हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषिपंपांसह इतर ग्राहकांकडे ८३४ कोटी ३१लाख रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील या थकबाकीमुळे महावितरणची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करावा अन्यथा हे आर्थिक संकट आणखीनच गडद होत जाणार असल्याचे महावितरणने परिपत्रकाद्वारे म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटापूर्वी मार्चपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील २ लाख ३८ हजार वीजग्राहकांकडे ५०१ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र गेल्या मार्चपासून कोरोनाचे संकट सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतर वीजबिलांचा भरणा कमी होत गेल्याने महावितरणच्या आर्थिक संकटाला सुरवात झाली आहे. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत ४ लाख ८७ हजारांनी वाढ झाली असून थकबाकीची रक्कम देखील तब्बल २२४ कोटी ३८ लाखांनी वाढली आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाख ८६ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २५७ कोटी ७८ लाख तसेच कृषिपंप व इतर १ लाख ४८ हजार ७०० ग्राहकांकडे ५७६ कोटी ४८ लाख रुपयांची अशा एकूण ७ लाख ३४ हजार ग्राहकांकडे ८३४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.