हमिदवाडा (प्रतिनिधी) : औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयसीचे सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत व त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील चार औद्योगिक वसाहतींमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाल्याची माहिती खा. संजय मंडलिक यांनी दिली. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स व जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, असोसिएशन, कामगार युनियन यांनी खा. संजय मंडलिक यांचेकडे ईएसआयचे सेवा दवाखाने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती.
यासंदर्भात खा. मंडलिक म्हणाले की, औद्योगिक वसाहतीतील कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या रहिवास ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कागल, शिरोली, हातकणंगले आणि हलकर्णी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ईएसआयचे सेवा दवाखाने सुरु करावेत, अशी मागणी मी केंद्रीय श्रम मंत्रालयात वेळोवेळी केली होती. तसेच माझे सहकारी, चेंबर ऑफ कॅामर्सचे संचालक व हॅास्पिटल समन्वयक विज्ञान मुंडे यांनी खास प्रस्ताव तयार करुन विशेष पाठपुरावा केला. त्यानुसार या चारही औद्योगिक वसाहतीमध्ये सेवा दवाखाने मंजूर झाले असून या ठिकाणी तज्ञ डॅाक्टर्स व औषधे उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात केंद्र शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांकरिता बांधण्यात आलेल्या या रुग्णालयाचा लाभ सुमारे दीड – दोन लाख कामगार व त्यांचे नातेवाईक यांचेसह सुमारे पाच लाख रुग्णांना होतो. या रुग्णांना औषधोपचार व इतर बाबींसाठी कोल्हापूरला यावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असे. आता मात्र सुरू होणाऱ्या या सेवा दवाखान्यामुळे या रुग्णांना वैद्यकीय सुविधा त्यांच्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात विनामोबदला मिळणार आहेत.
खा. मंडलिक यांनी संसदेत व संसदेच्या बाहेर याकरीता सातत्याने पाठपुरावा केल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्याकरीता जास्त संख्येने सेवा दवाखाने सुरु करणारा कोल्हापूर हा देशातील पहिलाच जिल्हा बनला आहे. उद्योजक व कामगारांनी याबद्दल खा. मंडलिक यांचे आभार मानले असून निरनिराळ्या औद्योगिक असोसिएशनकडून त्यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.