कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करावे, रायगड विकास प्राधिकरणाला गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करावे, या मागण्यांचे निवेदन खा. छ. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज (शनिवार) दिले. मुख्यमंत्री सावंत या दोन्ही मागण्या मान्य करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी दिली.

खा. संभाजीराजे यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. खा. संभाजीराजे यांनी सांगितले की, गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु केल्यास विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल. रायगड विकास प्राधिकरणाला, गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करावे. पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष झाला. व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल.

मुख्यमंत्री सावंत सांगितले की, आमच्याकडे पोर्तुगीज आणि मराठी, इंग्रजी जाणणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला अम्ही सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊ. आम्ही सुद्धा गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील किल्ल्यांचे संवर्धन करत आहोत. तसेच गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करण्यात येईल.