कोल्हापूर  (प्रतिनिधी) : किणी टोल नाका बंद करा या मागणीसाठी मनसेच्या वतीने केंद्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयावर आज (शुक्रवारी) अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. हातात पैशाचे खोके आणि पैशाचे तोरण घेऊन मनसेचे कार्यकर्ते वाजत गाजत कार्यालयावर आले आणि जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले.

गेले १७ वर्षे किणी टोल नाका ठेकेदाराच्या ताब्यात आहे. शासनाने बांधा व वापरा, हस्तंतरित करा या पद्धतीने टोल नाके ठेकेदारांना दिले आहेत; परंतु शासनाच्या नियमांना हरताळ फासून, अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून मुदत संपली तरी जनतेला लुटण्याचे काम हे ठेकेदार करीत आहेत. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी कित्येकदा वाहनधारकांना मारहाण केली आहे. मनसे वाहतूक सेनेने टोल नाका बंद करण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याना मागणीचे निवेदन दिले आहे, मात्र अद्याप याची कार्यवाही न करता टोल नाक्याला मुदतवाढ देण्यात आले आहे, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. किणी टोल नाका बंद झाला नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी राजू जाधव, नागेश चौगुले, गजानन जाधव, राजू दिंडोर्ले, मोहन मालवणकर, प्रवीण माने, वैभव हिरवे, राजू बागवान, अण्णा तिळवे, विजय करजगार, नयन गायकवाड, मंदार पाटील, अभिजित पाटील, विशाल पाटील-पोर्ले, फिरोज मुल्ला, कृष्णात दिंडे, सुनील निरंकारी, नाना सावंत, बापू चव्हाण, अजय चौगले, किरण पोतदार, मनीष क्षीरसागर, किरण खाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.