कोल्हापूर ( प्रतिनिधी ) बोंद्रेनगर परिसरातील 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे पुण्याईचे काम आपल्या हातून झाले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. या बेघर कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचे पाहून अतिशय समाधान होत असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.


बोंद्रेनगर फुलेवाडी येथील मातंग वसाहत परिसरातील कै. महिपतराव बोंद्रे हाऊसिंग सोसायटी येथे आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे येथील शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने या ठिकाणी 77 आरसीसी घरे बांधली जात असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत 53 लाख रुपये खर्च करून करण्यात येत असलेल्या रस्ते डांबरीकरण, ड्रेनेज लाईन आणि गृह प्रकलपाच्या पहिल्या टप्प्याचा स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला.


आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील बेघर लोकांसाठी हा गृहप्रकल्प उभारला जात आहे. येथील लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर फुलेलेला आनंद पाहून मोठे समाधान लाभत आहे.

यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, इंद्रजीत बोंद्रे ,रीना कांबळे, अभिजित चव्हाण, अभिजित देठे, बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी शुभदा कुरकुटे, ठेकेदार राजेंद्र दीवसे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय बोंगाळे, यांच्यासह भागातील नागरिकआणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.