कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कोरोना लसीकरण केंद्रे सकाळी सातपासून सुरु करावीत, लस किती उपलब्ध आहे याची माहिती केंद्राच्या बोर्डावर एक दिवस अगोदर जाहीर कराव्यात, अशा सूचना आ. चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादबंरी बलकवडे यांना दिल्या.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर शहरात लसीकरण सुरु आहे. मात्र मागणीच्या तुलनेत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा सकाळी ७ पासून लागलेल्या असतात, तर केंद्र सकाळी ९.३० ते १०.०० च्या सुमारास सुरू होते. केंद्र सुरू होताच लसीकरण केंद्राबाहेर लस संपली असा बोर्ड लावला जातो. परिणामी, नागरिक व आरोग्य कर्मचारी यांच्यात रोज वाद होतात. त्यामुळे नागरिकांची मागणी व वाढत्या उन्हाच्या तडाख्याचा विचार करून लसीकरण केंद्रे सकाळी ७ वाजता सुरू करावीत, लसीकरण केंद्रांवर किती लस उपलब्ध आहेत याची माहिती एक दिवस अगोदर बोर्डवर जाहीर करावी आणि तेवढ्याच नागरिकांना प्राधान्यक्रमाने लस दयावी. लसीकरण केंद्रावर पिण्याचे पाणी व बैठक व्यवस्था करावी व शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी, अशा सूचना आ. जाधव यांनी आयुक्त डॉ. बलकवडे यांना दिल्या.