कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी-म्हैशींकरीता घेण्यात येणाऱ्या ‘गोकुळश्री’ स्पर्धेत दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा, असे आवाहन चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले आहे.

ही स्पर्धा दि. २२ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कोणतीही पूर्वसूचना न  देता घेतली जाणार आहे. यासाठी संघाचे बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी, गोगवे, शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दि. २० नोव्हेंबरपर्यंत दूध संस्‍थेमार्फत आपली नावे नोंद करावीत. स्‍पर्धेमध्‍ये म्‍हैस १ ते ३ व गाय १ ते ३ क्रमांक काढले जाणार आहेत. स्‍पर्धेचे नियम व अटी संस्‍थेना परिपत्रकाद्वारे पाठवले आहेत.

‘गोकुळश्री’ स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे. याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करुन देणे. तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षित करुन दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी ही स्पर्धा गेल्या २७ ते २८ वर्षापासून घेतली जात आहे.