कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात काल (शनिवार) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे आणि पणुत्रेच्यामध्ये असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.

कोल्हापुरात काल रात्री सौम्य भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. तर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले तर काही भागात जाणवले नसल्याचे सांगण्यात आले.

जमिनीच्या आत भूकंपाची खोली ३८ किलो मीटर असल्याने भूकंपाचा धक्का सौम्य प्रमाणात जाणवला. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून याची अधिकृत माहिती आली नाही. कोयनेपासून १५२ किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे सांगितले. कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही उजनी खोऱ्यात भूकंप झाल्याची नोंद आहे. कोल्हापूरबरोबरच सोलापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे सांगण्यात आले.