करवीर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि ऐक्झिन सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या ऐक्झिन या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेद्वारे आय. टी. क्षेत्रातील उदयोन्मुख विषयांचे जागतिक स्तरावरील तज्ज्ञ प्राध्यापकांचे व्याख्याने विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.
नेदरलँड येथील ऐक्सिन ही संस्था आय.टी. क्षेत्रातील तंत्रज्ञानातील वैश्विक स्तरावरील प्रमाणपत्र देणारी संस्था आहे. याच बरोबर आय. टी. क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व प्रकारच्या शासकीय आणि खासगी संथांना नामांकन देण्याचे देखील काम करते. ही संस्था गेल्या ३६ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून जगभरातील १७५ देशांमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर या संस्थेमध्ये आय.टी. क्षेत्रामध्ये विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रशिक्षण सामग्री देखील बनवण्याचे महत्वपूर्ण कार्य चालते. या कराराद्वारे तंत्रज्ञान व बदलत्या काळातील आधुनिक विषय, उपकरणे आणि त्यांचा वापर व पद्धती यांचे आदान-प्रदान होईल. याचा प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
या महत्वपूर्ण करारासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हाजो जनसेन, भारत प्रदेश संचालिका नम्रता साहू आणि व्यापार प्रमुख धनंजय वडेर यांचे महाविद्यालयाने आभार मानले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. एस.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या वेळी संस्थेचे रेजिस्ट्रार प्रा. डॉ. लितेश मालदे, संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. भगतसिंग जितकर, प्रा. मंदार केकडे आणि अध्यापक वर्ग उपस्थित होते.