कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहकाराचे आदर्श मॉडेल असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील रयत संघ हा मानबिंदू आहे. सध्या खासगीकरणाच्या विळख्यात सहकार अडकलेला असताना रयत संघाचे काम आदर्शवत आहे. संघाच्या बैलजोडी छाप हातमिश्र खतावर शेतकऱ्यांनी कायम विश्वास ठेवला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते रयत सेवा कृषि उद्योग सहकारी संघाच्या बैलजोडी छाप हातमिश्र खत उत्पादन शुभारंभात आज (शनिवार) बोलत होते.

ना. सतेज पाटील म्हणाले की, स्व. एस. आर. पाटील यांच्यानंतर गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांनी रयत संघाची घोडदौड पुढे सुरु ठेवली आहे. सहकारात सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे. पहिली संस्था व नंतर मी हे धोरण अवलंबिले पाहिजे, तरच सहकार टिकेल. रयतचे व माझे नाते पूर्वीपासूनच जिव्हाळयाचे आहे. आबाजी आणि मी गेली १० ते १५ वर्ष कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत होता. परंतु, आबाजीची प्रशासनातील काम करण्याची सचोटी ही त्यांच्याजवळ गेल्यानंतर समजली.

रयत संघाचे मार्गदर्शक संचालक विश्वास पाटील म्हणाले की, रयत संघाची मिश्रखते वापरून उत्पादन वाढीसाठी शेतक-यांनी प्रयत्न करावा. संघाने शेतक-यांना नेहमी गुणवत्तापूर्वक व कमी किंमतीत खते देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संघावर पूर्ण विश्वास आहे.

याप्रसंगी संघाचे चेअरमन नेमगोंडा पाटील, व्हा. चेअरमन माधुरी जाधव, संघाचे व्यवस्थापक तानाजी निगडे, शिवाजी देसाई, सचिन पाटील, सुभाष चौगले, चिंतामण गुरव, कुंडलिक पाटील, निवृत्ती पाटील, शिवाजी भोसले, आनंदा तिवले, मारुती मोरे, विलास पाटील, दत्तात्रय हराळे, निर्मला निगडे आदीसह पदाधिकारी,   कर्मचारी उपस्थित होते.