दिल्ली/वृत्तसंस्था : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आपला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरील आव्हानाच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात झालेल्या या सुनावणीत आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. ते मागील सहा महिन्यांपासून अटकेत होते. तर संजय सिंह यांना दिलेली सूट इतर सर्व प्रकरणांमध्ये उदाहरण म्हणून लागू करता येणार नाही असेही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, संजय सिंह यांना जामीन मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ED ने सांगितलं म्हणून संजय सिंह यांना जामीन मिळाला. पण याचा परिणाम इतर प्रकरणावर होणार नाही. तसेच या खटल्याचा संदर्भ वापरता येणार नाही.

महत्त्वाचं म्हणजे याच प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याभोवती फास आवळणाऱ्या ईडीने खासदार संजय सिंह यांच्या जामीनाला मात्र विरोध केला नाही. त्यामुळेच संजय सिंह यांना सहा महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. संजय सिहं यांना जामीन मिळाल्यानंतर आप पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रकरणात काहीही पुरावे नाहीत, भाजपकडून सूड बुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.