कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘नो मास्क नो एन्ट्री’ची मोहिम महापालिका प्रशासनाने गतिमान केली आहे. कोल्हापूर शहरात विना मास्क, सामाजिक अंतर न राखणाऱ्या नागरिकांविरोधात मोहिम कडक केली असून मागील आठवडयात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ३० लाख ७१ हजाराचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली.
यामध्ये २१ सप्टेंबर २०२० ते आज अखेर ७ दिवसांमध्ये हा दंड करण्यात आला असून यापुढेही ही मोहिम अधिक तीव्र करण्याचे निर्देश प्रशासकिय यंत्रणेला दिल्याचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी सांगितले. कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न राखणे, हॅण्डग्लोज न घालणाऱ्या दुकानदार, व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून रस्त्यावर विशेषत: सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींविरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने व्यापक मोहिम हाती घेतली आहे.
दि. २१ सप्टेंबर २०२० ते आज अखेर सात दिवसामध्ये वसूल केलेल्या ३० लाख ७१ जाराच्या दंडामध्ये, दि. २१ सप्टेंबर रोजी ४२८००, दि. २२ सप्टेंबर रोजी २८८८०, दि. २३ सप्टेंबर रोजी ५३२००, दि. २४ सप्टेंबर रोजी ४७९००, दि. २५ सप्टेंबर रोजी ४०२००, दि. २६ सप्टेंबर रोजी ३९३०० आणि दि. २७ सप्टेंबर रोजी ५४९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासियांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी केले आहे.