कुरुंदवाड (प्रतिनिधी) :- औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी आरोपींना पकडण्यात कुरुंदवाड पोलिसांना अपयश आले आहे. तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून कारवाईबाबत वारंवार आंदोलन करावे लागत असल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी आंदोलन अंकुशने पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात, राजीव पतसंस्थेत अध्यक्ष, सचिव, कॅशीयर व संचालक यांनी ५.३० कोटीचा गैरव्यवहार केला आहे. लेखापपरिक्षकांनी लेखापरीक्षण करुनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. गुन्हा नोंद होवून एक महीना उलटले तरी केवळ तीनच लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार आहेत मी काय करू असे सांगून हतबलता दाखवत आहेत. शिवाय औरवाडचे पोलिस पाटील यांचे वडील गुन्ह्यात आरोपी असताना त्यांनाही अटक केली नाही. त्यामुळे तपासाबाबत शंका येत असून या अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांना द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जयपाल उगारे, इरफान बहाद्दूर, प्रकाश सुर्यवंशी, सुखदेव गावडे, भास्कर गावडे, महावीर कुंभोजे आदींच्या सह्या आहेत.