कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर (घरफाळा) भरण्यासाठी ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

महानगरपालिकेने मंजूर धोरणानुसार दिनांक ३० जूनअखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये जूनअखेर ६ टक्के सवलत देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आर्थिक उत्पनाचे साधन मर्यादीत राहिल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होत आहे. त्यामुळेच नागरीकांना दिलास देण्याबरोबरच कर भरण्यास प्रोत्साहन करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत ६ टक्के सवलतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासक डॉ. बलकवडे यांनी घेतला.

ही सवलत योजना लागू करण्यासाठी संगणकीय सिस्टीममध्ये बदल करण्यास ६ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा कर वगळता यापूर्वीची मागील थकबाकी १ जुलैपासून भरता येणार आहे.