रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर महायुतीकडून भाजप आणि शिवसेनेनेही दावा केला होता. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी आग्रह धरला होता. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असे म्हणत प्रचाराला सुरुवात केली होती. अखेर आज पक्षानं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राणे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर खास करून भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तर पत्रकार परिषद घेत उदय सामंत आणि किरण सामंत यांनी नारायण राणे यांना पाठींबा दिला आहे.

नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यांनतर शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या किरण सामंत आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणेंना पाठिंबा जाहीर केला आहे. नारायण राणेंनीही त्यांचे आभार मानले आहेत. भाजपनं रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या मतदारसंघातील प्रमुख लढत आता निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात आता थेट सामना होणार आहे.

उदय सामंत-किरण सामंत काय म्हणाले?
नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. तत्पूर्वी उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून तिकीटवाटपावर चर्चा सुरू आहे. अर्ज भरण्याची वेळ आली तरी उमेदवार जाहीर झाला नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे किरण सामंत यांनी निर्णय घेतला. नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली तरी, प्रामाणिक काम करू. उद्या उमेदवारी अर्ज भरताना आम्ही राणे यांच्यासोबत ताकदीने उभं राहू. महायुतीत तिढा नको म्हणून किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला आहे. तर किरण सामंत म्हणाले की, ‘नारायण राणे यांना माझ्या शुभेच्छा.’

दरम्यान, सामंत यांनी पाठिंबा दिल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन करून त्यांचे आभार मानले.