कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासगी वैद्यकीय व्यावसाईकांकडे उपचारांसाठी नोंदणी होणाऱ्या गरोदर मातांची शासकीय रुग्णालयाकडे नोंद होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे नोंद होणाऱ्या गरोदर मातांच्या नोंदी शासकीय रुग्णालयास पाठवाव्यात. यासाठी आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय रुग्णालयांना माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा. अतिजोखमीच्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांची एकत्रित यादी करावी. या यादीतील ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांना रेशन कार्ड देण्यात यावे. यादीतील लाभार्थींना लागणारे रेशन आणि आर्थिक मदत याबाबत आवश्यक निधीचा प्रस्ताव पाठवावा. अशासकीय संस्थामधील हस्तक्षेप प्रकल्पामध्ये काविळ नियंत्रण कार्यक्रम राबवावा.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु. जी. कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.