कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचारी कल्याण मंडळामार्फत कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारांच्या हॉस्पिटल खर्चासाठी म्हणून वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत यापुढे बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च  मिळणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत हा निर्णय झाला.

कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने बँकेने कोणती काटकसर न करता सर्व आजारासहित आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीशी करार धनादेश दिलेल्या दिवसापासून ही विमा योजना लागू केली आहे. यामध्ये सर्व म्हणजे १४३६ कर्मचारी समाविष्ट असून त्यांना पहिल्या दिवसापासूनच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोरोनाचे उपचार घेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्र लिहून या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती संचालक मंडळाला दवाखान्यातून केली होती. त्यानुसार ज्येष्ठ संचालक पी जी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.कोविड महामारीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेने याआधीच बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत दहा लाख रुपयांचा विमा योजना लागू केली आहे.

दुर्देवाने कोणत्याही कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास झाल्यास एलआयसीच्या दहा लाखांच्या विम्यासह  पाच लाख रुपये बँकेच्या नफ्यातून आणि सहा लाख रुपये  ईडीएलआय योजनेतून अशी २१ लाखाची तरतूद केली आहे. कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखांच्या एलआयसी विम्यासह बारा लाख रुपये ईडीएलआय योजनेतून अशी २२ लाखांची तरतूद तर कोणत्याही कारणांने मृत्यू झाल्यास दहा लाखांचा एलआयसी विमा व ईडीएलआयमधून सहा लाख अशी १६ लाखाची तरतूद करून ठेवली आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना लवकरात लवकर अनुकंपा तत्वावर नोकरीत घेण्याची बँकेने तरतूद केली आहे.

या बैठकीला राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी एन पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, असिफ फरास,  विलासराव गाताडे, अनिल पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आर.के. पवार, उदरयानीदेवी साळुंखे आदी उपस्थित होते.