कुडाळ (प्रतिनिधी) : प्रशिक्षण निश्चित नसताना कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक काश्मीर येथे जाऊन आले. या झालेल्या खर्चाला जबाबदार कोण ? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. जनतेच्या पैशावर नगरसेवकांनी फक्त मजा केली असल्याचा आरोप केला जात आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांसाठी काश्मीर येथे सभा शास्त्र तसेच नगरपंचायतीच्या कायद्यांसंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कुडाळ नगर पंचायतीच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी काश्मीर येथे दौरा निश्चित केला. या प्रशिक्षणासाठी सत्ताधाऱ्यांमधील १० नगरसेवक आणि विरोधकांमधील ४ नगरसेवक काश्मीर येथे गेले. मात्र, त्या ठिकाणी या प्रशिक्षणाची निश्चिती न झाल्यामुळे या नगरसेवकांना या प्रशिक्षणात प्रवेश मिळाला नाही. या प्रशिक्षणाची निश्चिती का झाली नाही? याला जबाबदार कोण? आणि नगरसेवकांना काश्मीरला जाण्यासाठी झालेल्या खर्चाला जबाबदार कोण? याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

जर प्रशिक्षण निश्चित झाले नव्हते तर लोकांच्या पैशांवर मजा मारण्याचा अधिकार नगरसेवकांना कोणी दिला ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. या प्रशिक्षणासाठी स्वनिधीमधून खर्च करण्यात आला होता. हा निधी नागरिकांच्या करामधून गोळा केला जातो आणि या निधीतून नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

मात्र, प्रशिक्षणाची निश्चिती झाली नव्हती. नगरसेवक काश्मीरला जाऊन फक्त पर्यटन सहल करून आले का ? असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे.