कुरुंदवाड (प्रतिनिधी) : येथील साधना मंडळ व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने राष्ट्र सेवा दल दिनानिमित्त २१ ते ३० डिसेंबरअखेर ३८ व्या जागर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, समाजामध्ये वाचन आणि श्रवण संस्कृती वाढावी, या उद्देशाने गेली ३८ वर्षे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. राज्य व देशातील नामवंत विचारवंताना निमंत्रित करुन ज्ञानाचा जागर अखंडितपणे सुरु ठेवला आहे.

या व्याख्यानमालेत बुधवारी- (दि. २१) सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांचे ‘माझ्या वाटेवरचे सत्य आणि न्याय’ या विषयावर, गुरुवारी- अनंत राऊत (औरंगाबाद) ‘कवितेतील जगणं, जगण्यातल्या कविता’, शुक्रवारी- जयवंत आवटे (कुंडल) यांचे ‘कथाकथन’, शनिवारी- सविता पवार (कणकवली) यांचे ‘सावित्रीबाईच्या पाऊलखुणा शोधताना,’  रविवारी- प्राचार्य राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर) यांचे ‘भारताला फॅसिझमचा धोका,’ सोमवारी- प्रा. नवनाथ शिंदे (आजरा) यांचे ‘क्रांतिसिंह नाना पाटील ‘एकपात्री प्रयोग,’ मंगळवारी- अन्वर राजन (पुणे) यांचे ‘ राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीयत्व’, बुधवारी संजय मं. गो. (ठाणे) यांचे ‘ऊर्जा, हवामान बदल आणि शाश्वत विकास’. गुरुवारी- डॉ. अनिल मडके (सांगली) यांचे ‘कोविड नंतरचे जग’ आणि व्याख्यानाचा समारोप शुक्रवारी (दि. ३०) श्रीपाल सबनीस (पुणे) यांचे ‘संविधान संस्कृती आणि समाजवाद’ या विषयावर व्याख्याने होणार आहे.

येथील कुमार विद्यामंदिर क्रमांक एकच्या प्रांगणात दररोज सायंकाळी पाचला होणार्‍या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन सुभेदार यांनी केले. यावेळी जयपाल बलवान, वैभव उगळे, अब्बास पाथरवट, खुदबुद्दीन दानवाडे, महावीर पोमाजे, महावीर कडाळे, श्रीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.