ढाका (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद म्हणजे १३१ चेंडूत २१० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

ईशान किशनचे द्विशतक आणि विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ईशान किशन आणि विराट कोहलीनं बांगलादेशचा कर्णधार लिटन दासचा हा निर्णय अयोग्य ठरवला. या सामन्यात ईशान किशनने २१० आणि विराटने ११३ धावांचे योगदान देत भारताची धावसंख्या ४०० पार पोहोचवण्यात मदत केली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चाहर यांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांनाही दुखापत झाली होती. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. या मिळालेल्या संधीचे  ईशान किशने सोने करून दाखवले आहे.

२४ वर्षीय किशनने ख्रिस गेलला (१३८ चेंडूत) मागे सोडले. गेलने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा पराक्रम केला होता. माजी कर्णधार विराट कोहलीने आपले ४४ वे वनडे शतक पूर्ण केले आहे. कोहलीने १२१४ दिवसांनंतर या फॉरमॅटमध्ये शतक केले आहे. त्याने त्याचे शेवटचे शतक १४ ऑगस्ट २०१९ रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले. त्यानंतर त्याला २५ डावात शतकही करता आले नाही.

इशानने द्विशतक झळकावलं तर विराटने ७२ वे शतक झळकावले. विशेष म्हणजे आता सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. विराटने ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टींगच्या ७१ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने हे ऐतिहासिक शतक षटकार मारत झळकावले.

पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिखर धवन आठ चेंडूंमध्ये तीन धावा करुन बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि इशान किशनने २९० धावांची भागीदारी केली. यादरम्यान इशानने १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकांच्या मदतीने इशानने २१० धावा केल्या. इशानला उत्तम साथ देणाऱ्या विराटनेही आपलं ७२ वं शतक साजरे केले. विशेष म्हणजे हे दोघेही टी-२० क्रिकेटप्रमाणे वेगाने खेळत होते. त्यामुळेच विराटनेही ९१ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि दोन षटकार लगावले. यापैकी एक षटकार तर त्याने एक षटकार त्याने ९७ धावांवर असताना लागवला. ८३ चेंडूंमध्ये विराटने सतक झळकावलं.