कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी प्रभागनिहाय केंद्र वाढवा, सर्वसामान्य नागरिकांना सहजरित्या लस उपलब्ध झाली पाहिजे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करावे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याबरोबरच तिसरी लाट येऊच नयेत यादृष्टीने प्रशासनाने काम करावे अशा सूचना आ. चंद्रकांत जाधव यांनी प्रशासनाला दिल्या.

आ. जाधव म्हणाले की, लसीकरणासाठी प्रशासनाने नागरिकांची यादी तयार करावी, त्यानुसार त्या नागरिकांना पूर्व सूचना द्यावेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नाही, याची दक्षता घेत. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया महापालिका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करावी. भाजी मार्केटमध्ये आजही मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करावे. विक्रेत्यांना बसण्यासाठी पट्टे मारावेत तसेच भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही उभे राहण्यासाठीही पट्टे मारावेत अशी सूचना आ. जाधव यांनी केली.

कोरोनाचे नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे नियम मोडणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करावी अशी सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनास दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, आरोग्य अधिकारी डॉ. पोळ,  डॉ. पवार, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी उपस्थित होते.