मुंबई  (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म, लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकीकरण हे स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडून महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना राणे यांनी दिले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील उद्योगांना गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील व्यापार, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ८ दिवसात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री सामंत यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना  दिले. मोठी गुंतवणूक वा मोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून, महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन  उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनीही मार्गदर्शन केले. नारायण राणे यांच्या हस्ते महिला उद्योजकता समितीचे धोरण व युथ विंग समिती, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नारायण राणे व उदय सामंत यांचा सत्कार केला.

महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील ३६ जिल्ह्यात महिला क्लस्टर, कृषी क्लस्टर व उत्पादन आधारित क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. यावेळी पर्यटन व कौशल्य विकासमंत्री नाम. मंगलप्रभात लोढा,  वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री आदी उपस्थित होते.