कोलकाता (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी मे महिन्यांत होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घालत मायक्रो नियोजन सुरु केले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

गांगुली राज्याच्या राजकारणात सक्रीय होऊन भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतो, अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बंगाल राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांना याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आतापर्यंत असे काहीही झालेले नाही, जेव्हा जेव्हा निर्णय होईल तेव्हा माहिती दिली जाईल, अशी सावध भूमिका घेत उत्तर दिले होते. दरम्यान, स्वत: सौरव गांगुली यांनी अनेकदा त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चा निराधार असल्याचा खुलासा केला आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगात रॉय म्हणाले की, दादा सौरव गांगुली पश्चिम बंगालच नाही, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. ते सर्व बंगाली लोकांचे प्रतीक आहेत, त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यास वाईट वाटेल. बंगालकडून एकमेव क्रिकेट कॅप्टन होता, राजकारणात त्यांची कोणतीही पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांचा निभाव लागणार नाही.