मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. या मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारपर्यंत हा अलर्ट असणार आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईत सोमवारपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. रात्री झालेल्या पावसानंतर मुंबईतील अनेक भागात काही काळ पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दहिसर ते आनंद नगर, चेंबूर-कांदिवलीपर्यंत पाणी साचले आहे. मुंबईत मध्यरात्री झालेला मुसळधार पावसामुळे सखल भाग असलेल्या अंधेरी सबवे, बांद्रा सायन मुख्यमार्ग, चेंबूर, सायन गांधी मार्केट, या सर्व परिसरामध्ये पाणी भरले.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत काही तासांतच रेकॅार्डब्रेक पाऊस पडत आहे. मुंबई शहर भागात ९५-९८ मिमी, उपनगरात ११५-१२४ मिमी पाऊस पडला आहे. हिंदमाता, दादर गांधीनगर अशा सखल भागात मुंबई महापालिकेने भूमिगत टाक्या बनवल्या. त्याचा फायदा झाला आहे. मागील वर्षी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचे हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.

भौगोलिक रचनेमुळे हा हिंदमाता परिसर सखल भागात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी लवकरच साचते. त्यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी महापालिकेकडून सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची क्षमता २.८७ कोटी लिटर इतकी आहे. पंपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकीमुळे पाण्याचा निचरा लवकर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. यंदाच्या पावसात भूमिगत टाक्यांचा फायदा दिसून आला असल्याचे चित्र आहे.