धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे ग्रामपंचायतीमार्फत सर्व व्यापारी, दूध संस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी आज (गुरुवार) आज ग्रामपंचायत हॉलमध्ये अँन्टिजेन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १५० जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

सरपंच अशोक सुतार म्हणाले, धामोड हे आजूबाजूच्या गावांसाठी मुख्य बाजारपेठ केंद्र असून परीसरातील नागरिकांची येथे ये- जा सुरू असते. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आम्ही या शिबिराचे आयोजन केले होते. व्यापारी वर्गाच्या जय भानोबा व्यापारी असोसिएशनने ग्रामपंचायतीने केलेल्या बंदच्या आवाहनाला नेहमीच प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या सहकार्यानेच इतर परिसराच्या तुलनेत या भागात रुग्णांची संख्या कमी आहे.

ग्रामविकास अधिकारी एल. एस. इंगळे म्हणाले यांनी सांगितले की, या शिबिरात सुमारे १५० जणांची चाचणी केली असून यामध्ये दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उद्या देखील हे शिबिर होणार आहे. या वेळी धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी एन. एस. गवळी, सर्कल व्ही. एस. तरडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.