कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कुरुंदवाड नगरपरिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहणाऱ्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून जि.प.च्या कुमार विद्यामंदिर नंबर ३ मधील विद्यार्थ्यासह शिक्षक यांना वेगवेगळ्या प्रकारे नाहक त्रास दिला जातो. यापासून शिक्षक आणि विद्यार्थी यांची सुटका करावी, या आशयाचे निवेदन प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांना मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी दिले आहे.

या धर्मशाळेच्या इमारतीमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर कुरुंदवाड नगरपरिषदेचे काही कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याकडून येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे जाणूनबुजून त्रास दिला जातो. यामध्ये सातत्याने वर्गात व बाहेर कचरा टाकणे, पाणी फेकणे, शौचालयाचे पाईप लिकेज करणे असे प्रकार करत आहेत. घरातील साऊंड सिस्टिम मोठ्याने लावून विद्यार्थ्यांना त्रास देणे, शिक्षण घेत असताना त्यात अडथळा निर्माण करणे, उद्धट भाषा वापरून येथून शाळा हलवा अशा प्रकारचे उत्तरे दिली जात असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे. संबंधित नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाबाबत नगरपरिषदेने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर मुख्याध्यापक रवी कुमार पाटील, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सह्या आहेत.