अमरावती (प्रतिनिधी) : मुंबई, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूरला गेले की, बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाळी अशा विविध प्रकारच्या थाळी खवय्यांना खायला आणि बघायला मिळतात. त्याच धर्तीवर आता अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्तीस्थळं असलेल्या दोन व्यक्तींच्या नावे व्हेज आणि नॉनव्हेज थाळी खवय्यांसाठी उपलब्ध केली आहेत.
त्यामध्ये ‘पवार नॉनव्हेज थाली’ आणि ‘फडणवीस व्हेज थाळी’ या दोन खास थाळी वऱ्हाडी खवय्यांना चाखायला मिळणार आहेत. कोरोना काळापूर्वी अर्थात फेब्रुवारी महिन्यातच ही आयडिया सुचली होती. त्यानुसार ‘पवार नॉनव्हेच थाली’ आणि ‘फडणवीस व्हेज थाळी’ सुरु केली. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. मात्र, आता नव्याने आणि नव्या उत्साहाने हॉटेल मालक आणि चालक ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहेत.
विशेष म्हणजे पवार नॉनव्हेज थाळी आणि फडणवीस व्हेज थाळी ही दोन व्यक्तींसाठी आहे. म्हणजेच एका थाळीत दोन जण आरामात पोटभर जेवू शकतात. दोन व्यक्ती असल्याशिवाय थाळी मिळणार नाही, हा कडक नियम आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे त्याची नासाडी होऊ नये हाच यामागचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तर पवार नॉनव्हेज थाळीमध्ये मटण, चिकन, अंडाकरीसह एक स्वीट, आईस्क्रीम, चिकन बिर्याणी, अनलिमिटेड तंदुरी रोटी देत आहेत. या संपूर्ण जेवणाची चव वऱ्हाडी असणार आहे. या थाळीची किंमत ६०० रुपये आहे. तर ‘फडणवीस व्हेज थाळी’मध्येही दोन व्यक्ती आरामात जेवू शकतात. ‘फडणवीस’ थाळीमध्ये तीन भाजी, दालफ्राय, एक स्वीट, आईस्क्रीम, व्हेज बिर्याणी, अनलिमिटेड रोटी मिळते. ही व्हेज थाळी ४०० रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबईच्या सरपंच थाळी, आमदार थाळी, खासदार थाळी, या प्रमाणे हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ‘पवार थाळी’ आणि ‘फडणवीस थाळी’ सुरु करण्याची कल्पना सुचल्याचे नितीन गुडधे-पाटील यांनी सांगितले