नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनलॉक – ५ अंतर्गत देशात विविध नियम लागू करून अनेक प्रकारच्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरमध्ये ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे देशात २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंधने आणली आहेत. १६ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडे मात्र लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी भारताने काही देशांशी हवाई करार केले आहेत. त्याला ‘एअर ब्रीज’ किंवा ‘एअर बबल’ असे म्हटले जाते. केनिया, भूतान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युएई, कतार, नायजेरिया, मालदीव, जपान, इराक, जर्मनी इ. अनेक देशांसह भारताने एअर बबल करार केले आहेत. दोन देशांमधील हवाई बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे प्रतिबंधात्मक परिस्थितीत त्यांच्या एअरलाइन्सद्वारे एकमेकांच्या प्रदेशात ऑपरेट करता येऊ शकते.