मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १८ तारखेपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, आज आणि उद्या महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. १६ रोजी सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
गुरुवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासन यंत्रणेला सजग राहण्याचे आवाहन केले आहे.