टोप (प्रतिनिधी): टोप गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता कोरोनारुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. दररोज दोन -तीन रुग्ण सापडत असल्याने गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत तसेच दक्षता समिती वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे .लोकांनीही नियम पाळणे गरजेचे आहे पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही.
गावात रुग्णांचा आकडा वाढत असताना काही नागरीक आपला आजार लपवण्यात धन्यता मानत आहेत. यामुळे रुग्णसंख्येत आणखी भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल न होता मेडिकल मधून परस्पर औषधे घेऊन आजार बरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांमुळे गावासह त्यांच्या घरातील लोकांनाही धोका निर्माण होत आहे. गावाला लागुनच शिरोली औद्योगिक वसाहत असल्याने अनेक नागरीक रोजगारासाठी याठिकाणी ये-जा करत असतात. परत आल्यानंतर घ्यावयाची काळजीही काही लोक घेताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांना ग्रामस्थांमधून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एकूणच टोप गावात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकुण रुग्ण : १०७,
उपचार घेवुन बरे झालेले : ६०,
मृत्यू : ७,
उपचार घेत असलेले : ४०