कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला असून, धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली आहेत. जोरदार पावसामुळे यंदाही महापुराची स्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

आज (शनिवार) सायंकाळी ६ वा. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी ३१ फूट ५ इंचावर पोहोचली असून, संततधारेमुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, चंदगड तालुक्यातील पिळणी पुलावर एक फूट पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली आहे. काही भागात नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागणार असल्याने त्यांचीही चिंता वाढली आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतीही पडल्याच्या घटना घडल्या आहेत. जोरदार पावसाचा एस.टी. वाहतुकीवर परिणाम झाला आहे.