उन्हाळा सुरू झाला, की साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताचा महिना म्हणलं तरी काही हरकत नाही. उष्माघात म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास किंवा उन्हाचा त्रास नसून, यामुळे इतरही काही आजार संभवतात; पण उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का..? बाहेरचं तापमान प्रचंड वाढत असतं आणि तुलनेत शरीराच्या आत पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होत असतं. यामुळं शरीरातल्या काही क्रियांवर परिणाम होतो. यातच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

उन्हाळ्यात कधी येऊ शकतो हार्ट अटॅक..? कसे व्हाल सावध

वाढलेल्या उन्हामुळे शरीरात पाण्याची कमी होते. यामुळेच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढते. हार्ट अटॅक येण्याची नेमकी कोणतीय लक्षणे आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

हृदयविकाराचं सुरुवातीचं लक्षण म्हणजे थकवा येणं. उन्हाळ्याच्या दिवसांत काही जण लवकर थकतात. त्यांच्या शरीराचं तापमान नॉर्मल नसतं. हृदयावर याचा थेट परिणाम होत असतो. अशातच जर उन्हाळ्याच्या दिवसांत अचानक बेशुद्ध पडायला झालं, तर हृदयविकाराचा झटका येण्याचा हा एक संकेत आहे, हे लक्षात घ्यावं. त्यामुळं याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

बऱ्याच वेळा उन्हात फिरल्याने डोकेदुखी होते. या डोकेदुखीमुळे बीपी वाढण्याची दाट शक्यता असते. जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर हार्ट अटॅक येऊ शकतो. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या. अनेकांना उन्हातून आल्यावर चक्कर येते, अशावेळी देखील हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते, यामुळे अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उन्हामुळं जर वारंवार डोकं दुखत असेल तर रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. या रक्तदाबावर वेळीच उपचार केला नाही तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बाहेरच्या वाढत्या तापमानामुळे शरीरातलं पाणी कमी होत असतं. शरीरातलं पाणी कमी होणं, हे आजाराला आमंत्रण देतं.

दिल्लीतल्या राजीव गांधी हॉस्पिटलमधल्या कार्डिऑलॉजी विभागातले डॉ. अजित जैन यांनी सांगितलं, की वाढत्या तापमानात आपलं शरीर हे बाहेरचं आणि शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळं हृदयाला रक्ताभिसरण जास्त करावं लागतं. दरम्यान, हृदयावर दाब येऊ शकतो. आणि त्यामुळं हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाचे ठोके अचानक वाढले तर हार्टअटॅक येतो. अशातच जर कोणी तासन्तास उन्हात उभे असतील तर त्यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना आपण ऐकली असेल. अशा अनेक घटनांमध्ये हृदयविकारासा झटका किंवा हृदय निकामी होणं हे मृत्यूचं कारण असतं.

कसा बचाव करता येईल?

  1. दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी प्यावं.
  2. लिंबू पाणी प्यावं.
  3. सकाळी न्याहरी टाळू नये.
  4. हिरव्या पालेभाज्या आणि फळं खावीत.
  5. सैलसर कपडे परिधान करावेत.
  6. कडक उन्हात जाणं टाळावं.
  7. कोणतंही लक्षण दिल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा