मुंबई (प्रतिनिधी) : कवी मोतीलाल राठोड यांच्या ‘पाथरवट’  या कविता ऐकून रात्री झोप येत नाही. तसेच हे ऐकून आपणच गुन्हेगार आहोत, असेही वाटते, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते त्यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात  बोलत होते.

शरद पवार म्हणाले की,  मी अनेकदा संध्याकाळी गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत घालवली आहे. त्याच्या मनात किती अस्वस्थता आहे, अन्याय-अत्याचाराबाबत ते काय विचार करतात. हे यामुळे ऐकायला मिळते. आपण समाजकारण करणार असेल, तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार आहोत, याचा विचार केला पाहिजे.

मोतीलाल राठोड हा कवी बंजारा समाजाचा कार्यकर्ता आहे. ते पालं म्हणजे झोपड्यांमध्ये राहतात. मी त्याला सहज विचारलं हल्ली तू काय विचार करतोय? तो म्हटला मी तुमच्या सर्वांच्या विरुद्ध विचार करतोय. त्याने त्याची लहानशी कविता सांगितली. त्या कवितेचं नाव पाथरवट. पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन हातोड्याने मूर्तीचे दगड फोडणारे पाथरवट, असे शरद पवार यांनी सांगितले.