विजयादशमी दिवशी महाराष्ट्रात परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देत सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी आपट्या पानाला अधिक महत्त्व असते; मात्र ही आपट्याची पाने त्यादिवसापूर्तीच महत्त्वाची नसून त्याचा इतर आरोग्याच्या समस्या दूर होण्यास देखील फायदा होतो.

आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो. या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच ‘अश्मंतक’ याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा.

आपट्याची पाने ही पित्त आणि कफदोषांवर गुणकारी आहेत. दाह, तृष्णा आणि प्रमेह यांच्यावर विजय मिळण्यासाठी आपट्याची पाने उपयोगी ठरतात. लघवीच्या वेळी खूप जळजळ होत असल्यास आपट्याच्या पानांचा हमखास चांगला परिणाम दिसून येतो. आपट्याची पाने शुष्क असल्यामुळे त्यांचा रस निघत नसल्यामुळे ही पाने पाण्यात घालावी व मग ओली पाने नीट वाटून घ्यावी. या रसामध्ये त्याच प्रमाणात दूध व साखर टाकावी आणि तयार काढ्याचे दिवसातून चार-पाच वेळा सेवन करावे. यामुळे लघवीच्या वेळी होणारी जळजळ थांबण्यास मदत होते.

आपट्याच्या शेंगा मूत्रल असल्यामुळे पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळ प्यायल्याने लघवी स्वच्छ होते व इतर त्रासही उद्भवत नाही. त्वचेवर जखम झाल्यास, व्रण उठल्यास त्यावर आपट्याची साल बांधण्याचा सल्लाही आयुर्वेदिक डॉक्टरांकडून दिला जातो. आपट्याच्या सालीचा काढा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध टाकून सेवन करावा. यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.

केवळ आपट्याचे पानच नाही, तर आपट्याच्या बियाही तितक्याच उपयोगी आहेत. या बियांचे बारीक चूर्ण करावे. ते चूर्ण गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार करावे. ही मलम मग कीटकांचा दंश झालेल्या ठिकाणी लावल्यानंतर बरे वाटते. आपट्याच्या बीयुक्त घृताचे सेवन केल्यास कृमी शौचावाटे बाहेर पडतात. मधाबरोबर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण १० ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो. गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असल्सास आपट्याच्या सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून घ्यावा. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालावा. तसेच गंडमाळेवर आपट्याची साल बांधावी. असे केल्यास गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होण्यास मदत होते.