जयपूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या संकटात औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राजस्थानमधील कोटा इथं असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे.

या दोन्ही भावांपैकी एकाने दोन रुग्णांसाठी रेमडेसेवीरचं इंजेक्शन चोरलं आणि त्यानंतर रुग्णांना पाण्याचं इंजेक्शन टोचलं. जे औषध त्यांनी चोरलं होतं ते जादा दरानं विक्री करण्यासाठी आपल्या जवळ ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी या दोन्ही भावांकडून २ इंजेक्शन्स जप्त केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे बुंदी जिल्ह्यातील निमोदा गावचे रहिवासी असून ते सख्खे भाऊ आहेत. हे दोघं सध्या महावीर नगरमध्ये राहत आहेत. या दोघांना १५ मे रोजी अटक करण्यात आली आहे.

एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने एकूण आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडस, औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले असून त्यांच्या या अडचणीचा गैरफायदा काळाबाजार करणारे घेत आहेत.