सिद्धनेर्ली ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीचा मांडव आपल्या दारात आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांच्या प्रचंड मताधिक्यांच्या विजयाची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे; सर्वांना सामावून घ्या आणि प्रचंड विजय मिळवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निवडणुकीचा मांडव आपल्याच दारात असल्यामुळे प्रसंगी दोन पावले मागे घ्या.

तिन्ही गटांचा सन्मान आणि समन्वय ठेवत प्रचंड विजय मिळवूया, असेही ते म्हणाले. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सिद्धनेर्ली ता. कागल येथे सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे रत्न कागल या भूमीनेच देशाला दिले. त्यांच्यामुळेच ही सामाजिक आणि आर्थिक हरितक्रांतीही झाली. त्यांच्याच पुरोगामीत्वाच्या वाटेवरून स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी वाटचाल केली. त्यांनी सामाजिक काम आणि श्रम करून गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवले.

त्यांचे प्रचंड उपकार आमच्यावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासातील त्यांचे योगदान मोठे आहे. गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, कागलचे सुपुत्र असलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधले. स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी गैबी बोगद्यातून कोल्हापूर शहराला पाणी सोडले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरासाठी थेट काळम्मावाडी धरणातूनच पाईपलाईन आणली.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, गोकूळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, सौ. पूनम मगदूम – महाडिक, विष्णू बुवा, बाळासाहेब चौगुले, रमेश पाटील, शहाजी पाटील, कृष्णात मेटील, रघुनाथ अस्वले, राहुल मगदूम – महाडिक, सुभाष चौगुले, व सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केले. प्रास्ताविक कागल तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील-बामणीकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय कुरणे यांनी केले. आभार दत्ता पाटील केनवडेकर यांनी मानले.