कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादीतील एका गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीला खिंडार पडलं. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यामध्ये विभागला गेला. यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांकडून परस्परांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये परस्परविरोधात संशयाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नामदार हसन मुश्रीफांना भाजपरूपी रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दामहून पाठवले आहे. ते लवकरच दहन करून परततील असे सांगत एकच खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर ना. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना म्हटले आहे की, जयंत पाटील यांनीच आमच्याबरोबर शपथ घेतली असती, परंतु एका गोष्टीमुळे ते शपथ घेऊ शकले नाहीत आणि या बाबतचा गौप्यस्फोट आम्ही लवकरच करणार आहे.

मुश्रीफांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली असून, आमदार जयंत पाटील यांना थांबवणारी ती घटना कोणती ? तसेच हसन मुश्रीफ नेमका काय गौप्यस्फोट करणार ? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार अस्याचे सूचक विधान केले होते. या विधानानंतर आता ना. मुश्रीफांनी ही केलेले वक्तव्य त्याच दिशेने रोख दाखवत असल्याने आमदार जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चा पुन्हा वेग धरु लागल्या आहेत. त्यामुळे जयंत पाटील या चर्चांवर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.