कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे. अभियंत्यांमुळेच देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुमार माने यांनी केले. अभियंता दिनानिमित्त ते जिल्हा परिषदेत बोलत होते.

जि. प. मधील ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभाग यांच्या वतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

माने म्हणाले, ‘तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विकासामुळे प्रत्येक देश विकसित होत असतो. त्या विकासासाठी अभियंता हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. संशोधक अथवा वैज्ञानिक जो शोध लावतात त्याचा पाठपुरावा करून दैनंदिन जीवनात तो शोध उपयोगात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभियंते करत असतात.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे म्हणाले, विश्वेश्वरय्या यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे देशातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. यावेळी प्रभारी उप कार्यकारी अभियंता दिलीप काशीद, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर आदी उपस्थित होते.