कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत तब्बल ३७ टक्के मतदान झाले आहे. दुपारपर्यंत ५० टक्यावर मतदान जाईल, असा अंदाज जिल्हा निवडणूक प्रशासनाचा आहे. सर्वच गावांत मतदानात कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर लांब रांगा लागत आहेत.

तीन हजार ३०७ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता सर्व ३८६ गावांत १ हजार ५५३ मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. राजकीय इर्षा असलेल्या गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया शांततेत चालू आहे. कोरोनाचा संसर्ग असल्याने सर्व नियम पाळून मतदान करून घेतले जात आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामांची धांदल सुरू असल्याने सकाळच्या टप्यातच मतदान करून बाहेर पडण्याचा कल मतदारांचा राहिला. म्हणूनच सर्वच मतदान केंद्रावर सकाळी गर्दी राहिली. दोन तासातच २० टक्के मतदान झाले. सकाळी साडेअकरा वाजता ३६ टक्के मतदान झाले. मतदानाचा वेग असाच राहिला तर दुपारपर्यंत ५० टक्यांवर मतदान होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.