कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या दुधाने आज (गुरुवार) रमजान ईदा दिवशी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून आज २२ लाख ३१ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे.

या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.

अरूण डोंगळे म्हणाले की, आज रमजान ईदा दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण. या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावेळी २२ लाख ३१ हजार २८४ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २० लाख ६३ हजार ६९२ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६७ हजार ५९२ लिटरची वाढ झाली. तसेच गुढीपाडव्यानिमित्य श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाल्याचे सांगितले.

तसेच गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्‍हणून मी त्‍यांना संचालक मंडळाच्‍यावतीने धन्‍यवाद देत असल्याचे डोंगळे म्हणाले.

यावेळी संचालक बाळासो खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी आदी उपस्थित होते.